Women’s in Technology : विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यांसारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर महिलांचे योगदान केवळ ३५ टक्के आहे. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांपासून हा आकडा जवळजवळ स्थिर आहे. ही माहिती युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (GEM) टीमने दिली आहे. टीमने यासाठी महिलांमध्ये कमी आत्मविश्वास आणि समाजात खोलवर रूजलेल्या लिंगभेदात्मक पारंपरिक मानसिकतेला जबाबदार धरले आहे.
युनेस्को टीमच्या एका सदस्याच्या मते, गणिताची भीती आणि मानसिक बंधने मुलींना मागे ओढतात. कारण मुलींनी गणितात चांगली कामगिरी केली तरीही सुरुवातीपासूनच त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. याव्यतिरिक्त, जुने लिंग-आधारित पूर्वाग्रह STEM सारख्या क्षेत्रात त्यांचा प्रवेश मर्यादित करतात. मुली करिअरच्या पर्यायांबद्दल विचार करत नसतानाही, विज्ञानाबद्दलचे नकारात्मक सामाजिक संदेश त्यांच्या आत्मविश्वासाला हानी पोहोचवतात.

एआयमध्ये फक्त २६ टक्के महिला
जगभरातील शिक्षण क्षेत्रातील विकास आणि प्रवृत्त्यांचा अभ्यास करणाऱ्या टीमने सांगितले की, डिजिटल परिवर्तनाचे नेतृत्व मुख्यतः पुरुषांकडे आहे आणि डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये महिलांची भागीदारी फारच कमी आहे. कामकाजाच्या जगातही ही असमानता इतकी तीव्र आहे की २०१८ ते २०२३ दरम्यान प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये डेटा आणि एआय क्षेत्रांमध्ये केवळ २६ टक्के कर्मचारी महिला होत्या. इंजिनिअरिंगमध्ये फक्त १५ टक्के आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये केवळ १२ टक्के महिला कार्यरत होत्या.
धोरणं आहेत, पण ती महिला केंद्रित नाहीत.
जगभरातील ६८ टक्के देशांमध्ये STEM शिक्षणाला पाठिंबा देणारी धोरणं अस्तित्वात आहेत, परंतु त्यापैकी केवळ निम्म्याच धोरणांचा केंद्रबिंदू मुली आणि महिलांवर आहे. जीईएम टीमने याला एक महत्त्वाची धोरणात्मक त्रुटी ठरवत सांगितले की, हीच गोष्ट लैंगिक समतोलात अडथळा ठरत आहे. युरोपियन युनियनमध्ये देखील, आयटी पदवी घेतलेल्या प्रत्येक चार महिलांपैकी फक्त एकच महिला डिजिटल नोकरीत गेली, तर पुरुषांमध्ये हा आकडा अर्ध्याहून अधिक होता. प्रत्येक दोनपैकी एक पुरुषाने डिजिटल व्यवसाय निवडला होता. जीईएम टीमने म्हटले आहे की, हे समाजासाठी एक मोठे नुकसान आहे.
रोल मॉडेल आणि मेंटरशिपमुळे बदले विचार
सोबतच या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आहे की मुलींनी STEM मध्ये महिलांना यशस्वी होताना पाहणे महत्वाचे आहे जेणेकरून त्या त्यांच्यासारखे होण्याचे स्वप्न पाहू शकतील. शाळांनी महिला-संचालित STEM क्लब तयार करावेत, स्थानिक व्यवसायांशी भागीदारी करावी आणि महिला व्यावसायिकांना भेटण्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. यामुळे मुलींना हे समजण्यास मदत होईल की तांत्रिक क्षेत्रातही त्यांची कौशल्ये मौल्यवान आहेत.
बदलावाची सुरुवात शाळेतून होणे आवश्यक
युनेस्कोने शिफारस केली आहे, की प्राथमिक शिक्षणातच लिंग निरपेक्ष भाषा वापरावी. महिलांना वर्गात गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रित केले पाहिजे आणि शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या पूर्वग्रहांची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना सुधारण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. याशिवाय, डिजिटल साक्षरता वाढवणे आणि एसटीईएम क्षेत्रातील विषय मुलींच्या आवडीशी जोडण्याची गरजही अधोरेखित केली आहे.











