आज दिवसभर राज्यभरात पुण्यातील पार्थ पवारांचे जमीन घोटाळ्याचे प्रकरण चर्चेत आहे. अशा परिस्थितीत पार्थ पवारांचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणावर काय भाष्य करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता या प्रकरणावर अजित पवारांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं आहे, नेमकं अजित पवार काय म्हणाले? पुण्यातील हे प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घेऊ…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्यातील उच्चभ्रू कोरेगावमधील महार वतनाच्या जमिनीवरून चांगलेच अडचणीत आले आहेत. महार वतनाची असलेली तब्बल 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये डल्ला मारल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर होत आहे. अशा परिस्थितीत नेहमी पुढे होऊन बोलणारे अजितदादा काय का बोलत नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

अखेर अजित पवार बोलले, म्हणाले….
“या प्रकरणाचा माझ्याशी दुरान्वये देखील संबंध नाही. या प्रकरणाची सगळी माहिती घेऊन मी माध्यमांशी बोलेन पण थेट अजित पवार म्हणून मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी घरातील मुले सज्ञान झाल्यावर आपापल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय करीत असतात. तीन चार महिन्यांपूर्वी काही गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या. परंतु कायद्याच्या बाहेर जाऊन काहीही करायचे नाही, अशा स्पष्ट सूचना त्यावेळी दिल्या होत्या,” असे सांगून मला अंधारात ठेवून हा व्यवहार झाल्याचेच अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला.
1,800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. या जमिनीचा बाजारभाव तब्बल 1800 कोटी होता. पण पार्थ पवारांच्या कंपनीने ही जमीन 300 कोटीत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आता दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काय रणणीती आखावी यासाठी या बैठका पार पडत आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे या बैठकीत आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या दरम्यान एक धक्कादायक बातमी आज सकाळपासून चर्चेत आहे.











