Shirdi Saibaba : सहकार पट्ट्यात समृद्ध असलेल्या नगर जिल्ह्यातलं एक गाव शिर्डी. जगाच्या नकाशावर या गावची एक आगळीवेगळी ओळख आहे. साईबाबांची शिर्डी असं या गावाला किंवा आता बदल झालेल्या या शहराला ओळखलं जातं. आता तर रात्रीच्या वेळीही लँडिंगची सोय शिर्डीच्या विमानतळावर सुरू झाली आहे. महाराष्ट्र असो की इतर राज्यातील नागरिक यांना शिर्डीत येण्याची आस असते.
याचं कारण म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या गावात प्रगट झालेला एक अवलिया फकीर. सर्वधर्मसमभावाची शिकवण या फकिरानं शिर्डीत येणाऱ्या प्रत्येकाला दिली. श्रद्धा आणि सबुरी या मूल्यांवर विश्वास ठेवण्याची ऊर्जाही दिली. याच फकिराचं नाव आहे साईबाबा आणि शिर्डीची ओळख झाली साईबाबांची शिर्डी म्हणून. ‘शिर्डी के साईबाबा’ हा सिनेमा 1970-80 च्या दशकात रीलिज झाला, आणि त्यानंतर या गावाचं महत्त्व देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर बदललं. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी, त्यांना नवस बोलण्यासाठी हजारो भाविक दररोज शिर्डीत येऊ लागले.

शिर्डीत दररोज हजारो भाविक येऊ लागले, तसं गावाचं अर्थकारण बदललं. भाविकांसाठी अत्यावश्यक सुविधा देणारे व्यवसाय तेजीत आले. त्यात फुलं, प्रसाद विक्रेते होते, हॉटेल्स, रेस्टॉरंट होते. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत गेली तसतसं या गावाचं अर्थकारणही बदलत गेलं. धार्मिक पर्यटनाचं क्रेंद्र ठरलेल्या साई संस्थानचा सध्याच्या टर्न ओव्हर 800 कोटींच्या पार गेलाय. यावरुन आजूबाजूच्या व्यावसायिकांचा टर्न ओव्हर किती असेल याची कल्पनाच केलेली बरी.
कशी बदलली शिर्डीची ओळख ?
शिर्डी आणि परिसरात फेरीवाले, हॉटेल्स व्यवसाय यासह अनेक व्यवसायांना 80 च्या दशकानंतर अच्छे दिन आले. या बदलत्या अर्थकारणासोबत गुन्हेगारीनंही शिर्डीत हातपाय पसरले.
शिर्डीत गुन्हेगारीची वाढ कशी झाली ?
1. 1980 च्या दशकानंतर शिर्डीचा चेहरामोहरा बदलत गेला
2. राज्यातील इतर भागातून, इतर राज्यांतून परप्रांतीय व्यवसायासाठी अनेक जणं शिर्डीत येऊ लागले
3. यातून फुलं-प्रसाद विक्रीत लूट सुरू झाली
४. काहींनी भाविकांना लुटण्याचा वाममार्ग स्वीकारला
५. हॉटेल्स, दुकानं चालण्यासाठी एजंट्सना बळ देण्यात आलं. कमिशनचे पैसे देण्यात आले, त्यात स्पर्धा सुरू झाली.
5. कमिशन आणि इतर मार्गांनी अनेकांना प्रत्यक्ष काम न करता भरमसाठ पैसा मिळू लागला
6. झटपट पैशांतून शिर्डीतील अनेकांची व्यसनाधिनता वाढीस लागली
7. व्यसनाधिनतेसोबतच बदलत्या काळात शिर्डीतील गुन्हेगारीही वाढली
8. शिर्डीत स्थानिक, परराज्यांतून येणाऱ्या गुन्हेगारांचं प्रमाणही वाढलंय
9. हाणामाऱ्या, हत्या, गँगवॉर ही शिर्डीची नवी ओळख झाली
10. भाविकांना गुंडांचा आणि गुन्हेगारांचा त्रास वाढला
11. 2011 साली पाप्या शेख टोळीकडून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती
12. शिर्डीत आत्महत्या, हत्या, चेन स्नॅचिंग प्रकार वाढीस लागले
हे गुन्हेगारीचं सत्र भविष्यात सातत्यानं वाढत गेलं. मार्चमध्ये साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची पहाटेच्या सुमारास माथेफिरूनी हत्या केल्यानं शिर्डीतील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
गुन्हेगारी वाढण्याचं कारण काय?
झटपट मिळणारा पैसा, वाढलेली व्यसनाधिनता यासोबतच शिर्डीकरांचा आणि पोलीस प्रशासनाचा नसलेला धाक अशी काही गुन्हेगारी वाढीची कारणं असल्याचं सांगण्यात येतंय. साध्या चप्पल चोरांपासून ते राष्ट्रीय गुन्हेगारांसाठी शिर्डी ही आश्रयस्थान ठरतेय.
साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची चर्चा पुन्हा सुरू झालीये. शिर्डीकराचा रस्त्यावरील ताप पाहायला मिळाला. गुन्हेगारांची आश्रयस्थानं असलेल्या अतिक्रमणांना हटवण्याच्या कामांना प्रारंभ झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे सजग झाले. भिकाऱ्यांना फुकट जेवण देऊ नका, अशी मागणी सुजय विखेंनी केली, ती वादग्रस्त ठरली. पोलीस प्रशासनही कठोर पावलं उचलतात. मात्र गुन्हेगारांचे नव-नवे कारनामे दररोज समोर येतच राहिले.
काय करण्याची गरज?
शिर्डीत गुन्हेगारीनं जास्त डोकं वर काढलं की, ग्रामस्थ एकत्र येतात, निषेध नोंदवतात. मात्र काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. साईंची शिर्डी गुन्हेगारीमुक्त करायची असेल तर, त्यासाठी शिर्डीकरांनी एकत्र येत उपाय सुचविण्याची आणि अंमलबजावणीची गरज व्यक्त होत आहे. शिर्डीकरांच्या एकजुटीतूनच नवी व्यवस्था, शिस्त आणि धाक निर्माण होण्याची आशा आहे.











