राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांना फोन करत संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. संजय राऊत यांना आतड्याचा कॅन्सर असल्याच्या चर्चा माध्यमात सुरू असतात, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. खरंतर एकनाथ शिंदे आणि संजय राऊत हे राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. मात्र आज संजय राऊत यांच्या आजारपणाच्या काळात त्यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती जपली आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी फोन वरून संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि लवकर बरे व्हा अशा शुभेच्या दिल्या.

उदय सामंत यांचे ट्विट –
शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा विडिओ सोशल मीडियावर ट्विट करत माहिती दिली. त्यांनी म्हंटल, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मा. खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली. साहेबांची ही सहृदयता आणि सर्वांप्रती असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ओळख आहे.
राऊतांचा सातत्याने शिंदेंवर हल्लाबोल
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊत विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असा थेट ‘सामना’ नेहमीच पाहायला मिळाला आहे. संजय राऊत हे नेहमीच शिंदेंच्या शिवसेनेवर आणि खुद्द एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात. अतिशय कडवट शब्दांत टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही राऊतांना त्याच भाषेत उत्तर दिलं जातं. मात्र आता संजय राऊत आजारी पडल्यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा प्रार्थना केल्या जात आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पुढील दोन महिने सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मिडीया ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली. त्यांनी म्हंटल होते, आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन.











