सरकारी नोकरीचे आमिष दाखवत 18 जणांची फसवणूक; मुंबईत गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देतो असं सांगत, दोघा आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देतो असं सांगत, दोघा आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहाकडून त्यानंतर या फसवणूक प्रकरणात आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

फसवणूक प्रकरणात दोन आरोपींना अटक

विशाल कांबळे आणि साहिल गायकवाड अशी या फसवणूकीच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मिळून तब्बल अठरा जणांंना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. विशाल कांबळे आणि साहिल गायकवाड या दोघांनी खोटा बनाव करत अनेकांना वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगितले. त्यांनी विशेष करून मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देण्याचं खोटं आमिष दिलं. त्यासाठी या दोघांनी पोलीस असल्याचं तसंच राजकीय नेत्याचा सुरक्षारक्षक असल्याचं समोरच्या व्यक्तींना भासवून दिलं आणि फसवणूक केली. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनी तब्बल अठरा जणांची फसवणूक केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने फसवणूक

सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्यासाठी आणि खोटा बनाव करण्यासाठी या दोन्ही आरोपींकडून बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे. मंत्रालयासह रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देण्याचं खोटं आश्वासन देत ही फसवणूक करण्यात आली. त्यासाठी आरोपींनी बनावट ओळखपत्रं आणि आयकर विभागाची बनावट कागदपत्रं वापरली. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून कारवाई दरम्यान ही बनावट कागदपत्रे आता जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहाकडून अधिक तपास सुरू आहे.

या फसवणूकीच्या प्रकारानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पोलिसांनी म्हटलंय की, ‘अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीच्या आमिषांना बळी पडू नये’. असा सावधगिरीचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही लागेबांधे समोर येतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News