Anurag Borkar : चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. NEET परीक्षेत यशं मिळवून सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेण्याचं स्वप्न लाखो विद्यार्थी पाहतात. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून नीट परिक्षेची तयारी करतात. कष्ट करून नीट परिक्षेत उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेताना पाच वर्ष खडतर मेहनत करतात. परंतू NEET परीक्षेत चांगले यशं मिळवून देखील चंद्रपुरातील अनुराग बोरकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त करताहेत.
राहत्या घरी केली आत्महत्या
नवरगाव इथल्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा अनुराग बोरकरनं NEET UG-2025 परीक्षेत 99.99 टक्के मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1,475 वी रँक पटकावली होती. परंतु NEET परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवूनही 19 वर्षीय अनुराग बोरकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची दुःखद घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव इथं घडली आहे. अनुरागला उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तो मंगळवारी पहाटे घरातून बाहेर पडणार होता.

मात्र, पहाटे चार वाजता त्याची आई त्याला उठवायला गेली. त्यावेळी अनुरागच्या आईला मोठा धक्का बसला. कारण अनुरागनं राहत्या घरी आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवरगाव पोलीस करत आहे.
करिअरच्या दबावामुळं टोकाचं पाऊल
अनुराग बोरकर याची एक सुसाईड नोट मिळाली आहे. यात त्यानं मला डॉक्टर व्हायचं नाही असं लिहिलं आहे. या नोटवरून अभ्यास आणि करिअरच्या दबावामुळं अनुरागनं आत्महत्या केली, अशी प्रतिक्रिया ठाणेदार कांचन पांडे यांनी दिली आहे. तर सकाळी चार वाजता नवरगाव येथील अनुराग बोरकर (19) यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. याची नोंद सिंदेवाही पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. नीट परीक्षेतील यशानंतर अनुरागचं सर्वत्र कौतुक झालं होतं. मात्र नीट परीक्षेत यश मिळवूनही विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचलल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आणि परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.











