Mumabi – आज मुंबईसह महाराष्ट्रात 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे. या विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांची कुमक वाढविण्यात आली आहे. मात्र मुंबईतील गणेश विसर्जनावेळी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर नोएडामधून हल्ल्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मात्र या धमकीनंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाली आहे.
आरोपीला मुंबईत आणणार
दुसरीकडे मुंबई पोलीसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा संदेश पाठवणाऱ्या अश्विनी कुमार या आरोपीला मुंबई क्राईम ब्रांचनं दिल्लीहून अटक केली आहे. आरोपी अश्विनी कुमार सुप्रा हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. त्यानं वापरेला मोबाईल आणि सिमकार्ड पोलीसांकडून जप्त केलं आहे. आरोपीला मुंबईला आणल्यावर पुढील चौकशी करण्यात येणार आहे. 400 किलो RDX 34 विविध गाड्यांमध्ये लावल्याची आरोपीनं पोकळ धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिस आयुक्तांना संपर्क साधून मदत मागितली होती. त्यानंतर JCP (संयुक्त पोलिस आयुक्त) यांच्या नेतृत्वाखालील SWAT टीमने कारवाई करत अश्विनी कुमारला अटक केली. पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

400 किलो RDX 34 गाड्यांत लावण्याची धमकी…
दरम्यान, नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणारा व्यक्तीचे नाव अश्विनी कुमार (वय 50) असे आहे, आरोपी अश्विनी कुमारला सेक्टर 79 येथून अटक करण्यात आली आहे. अश्विनी कुमारने 400 किलो RDX 34 गाड्यांमध्ये लावण्याची आणि कोट्यवधी लोकांचा बळी घेण्याची धमकी दिली होती. त्याने हा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवला होता. अशी माहिती नोएडा पोलिसांनी दिला आहे.











