हैदराबाद- एका खासगी शाळेत सुरु असलेल्या ड्रग्जच्या फॅक्टरीचा शनिवारी हैदराबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मेधा नावाच्या या शाळेत हा धक्कादायक प्रकार सुरु होता. या प्रकरणी शाळेचा संचालवक मालेला जया प्रकाश गौड याच्यासह तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या आरोपींनी शाळेतील क्लास रुम आणि प्रतिबंधित परिसराला अल्प्राजोलम नावाच्या ड्रग्जच्या निर्मितीचं केंद्र बनवलं होतं. अल्प्राजोलमचा वापर ताडी तयार करण्यासाठी करण्यात येतो. हा एक नशेचा पदार्थ असून तेलंगणात यावर बंदी आहे.

सहा महिन्यांपासून सुरु होता ड्रग्जचा कारखाना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेच्या दुसऱ्या माळ्यावर गेल्या सहा महिन्यांपासून हा ड्र्ग्जचा कारखाना सुरु होता. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर दररोज शाळा भरत होती आणि दुसऱ्या मजल्यावर भविष्य उद्ध्वस्त करणारा ड्र्ग्जचा कारखाना सुरु होता. आठवड्यात शाळा सुरु असलेल्या दिवसांत ड्रग्जची निर्मिती होत असे आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी ड्रग्ज शाळेतून बाहेर काढून त्याची विक्री करण्यात येत असे.
शाळेच्या संचालकाचाच ड्रग्ज निर्मितीचा प्रताप
तेलंगणा पोलिसांच्या इगलच्या टीमनं ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकानं ७ किलोपेक्षा जास्त अल्प्राजोलम, २१ लाखांची रोकड, मोठ्या प्रमाणात केमिकल आणि ड्रग्ज निर्मितीचं सामान जप्त करण्यात आलं आहे.
पोलिसांना या शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर रसायनांची प्रयोगशाळाही मिळालीय. यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचं उत्पादन करण्यात येत होतं. यासाठी आठ रिएक्टर आणि ड्रायरही लावण्यात आले होते. या शाळेचा संचालक आरोपी गौड याने त्याचा एक सहकारी गुरुवरेड्डी याच्याकडून ड्रग्ज निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं होतं.
ड्रग्ज सेवन आणि फॅक्टरीचं मोठं प्रमाण
गेल्या काही काळापासून ड्रग्जचे कारखाने कुठल्याही ठिकाणी असल्याचं पाहायला मिळू लागलंय. महाराष्ट्र असो वा तेलंगणा कुठल्याही परिसरात असे कारखाने सातत्यानं दिसू लागले आहेत. या ड्रग्ज निर्मितीतून कोट्यवधींची उलाढाल होते आहे आणि हे सगळं शोधण्यात आणि रोखण्यात पोलीस आणि यंत्रणा सातत्यानं अपयशी असल्याचं दिसतंय.











