सोलापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक अशा स्वरूपाची बातमी समोर आली आहे. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासुर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला. बर्गे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. याबाबत पोलीसांकडून ही हत्या की आत्महत्या असा तपास सध्या सुरू आहे. मात्र, त्यांनी पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकी काय घटना घडली?
गोविंद बर्गे लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते. लुखामसला येथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. ते पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, त्याठिकाणी काही वाद झाल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वत:च्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती समोर येत आहे, पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. सकृतदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरी पोलीस गोविंद बर्गे यांच्यासोबत घातपात झाला का, ही शक्यताही पडताळून पाहत आहेत. गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

पूजाचा गोविंद बर्गेंवर दबाव ?
या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाडवर बर्गे कुटुंबियांकडून आरोप करण्यात येत आहेत. गोविंद बर्गे यांना कलाकेंद्रात जाण्याचा नाद होता. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. पुढे प्रेम झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. यामुळे गोविंद बर्गे तणावात होते.
आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. गोविंद बर्गे यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी 21 वर्षांच्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. शिवाय सध्या पूजा पोलिसांच्या अटकेत असल्याची माहिती समोर येत आहे.











