नागपूर – भटक्या कुत्र्यांवरुन देशात चर्चा सुरु असतानाच आता नागपूर पोलिसांनी एक अधिसचूना काढलीय. ज्यातून कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आलीयत. नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या कायम आहे.. तर अनेक वस्त्यांमध्ये पाळीव कुत्र्यांमुळेही लोकांना मनस्ताप होतोय. या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अधिसूचना काढलीय. ज्यात काही कठोर नियम केलेत.
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत निर्णय देताना सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाद्य घालण्यास मनाी दिली होती. तसंच भटक्या कुत्र्यांची नसबंदी करुन त्यांना पुन्हा त्याच भागात सोडण्याचे निर्देश दिले होते. तसंच हे आदेश देशभरात लागू असतील असं सांगत याबाबत राष्ट्रीय धोरण निर्मितीची अपेक्षा केंद्र सरकारकडून व्यक्त केली होती. आता याच निकालाच्या आधारे नागपूर पोलिसांनी पावलं उचलली आहेत.

नियम पाळले नाहीत, तर थेट गुन्हा!
नागपूर पोलिसांच्या अधिसूचनेनुसार, मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य दिल्यास गुन्हे दाखल करणार. पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरवताना तोंडाला जाळी लावावी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 44 अंतर्गत अधिसूचना जारी, कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचा पत्ता आणि फोन नंबर बंधनकारक, कुत्र्यांचा उपद्रव आढळल्यास 112 क्रमांकावर तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात पट्टे अडकवण्याचं बंधन आता यापुढे नागपुरात असणार आहे. या पट्ट्यांवर कुत्र्यांच्या मालकांचं नाव आणि पत्ताही टाकण्याचे आदेश देण्यात आलेत.
प्राणीप्रेमींचा विरोध, नागपूरकरांकडून स्वागत
कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनी ही कठोर पावलं उचलताच प्राणीप्रेमींनी मात्र याला विरोध केलाय. तर कुत्र्यांना त्रासलेल्या नागपूरकरांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय. कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नका, असं सांगितल्यानंतरही बरेचदा प्राणीप्रेमी ऐकत नाहीत. खाणं घालताना त्यांना रोखलं तर विरोध होतो. पण कामात अडथळा आणल्यास आता थेट गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे आता तरी नागपूकरांची कुत्र्यांच्या उपद्रवातून सुटका होते का? हे पाहावं लागणार आहे. नागपूरपाठोपाठ राज्यात अशी कठोर पावलं उचलली जाणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.











