सत्ताधारी यांच्यासह विरोधकही दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार, आजपासून उद्धव ठाकरे दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर

सत्ताधाऱ्या पाठोपाठ विरोधक देखील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शेतीच्या बांधावर जाणार आहेत. शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौरा करणार आहेत. तर जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

Marathwada Flood – सध्या पावसाचे रौद्र रुप पाहयला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं, ठिकठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होत असताना, आणि आता सत्ताधाऱ्या पाठोपाठ विरोधक देखील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शेतीच्या बांधावर जाणार आहेत. शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौरा करणार आहेत. तर जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

ठाकरे, जयंत पाटील, सपकाळ जाणार शेतीच्या बांधावर

दरम्यान, मराठवाड्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर केंद्र सरकारने जशी बिहारला मदत केली, तशी राज्याला करावी, आणि केंद्र सरकारने तत्काळ १० हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तथापि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची विरोधक पाहणी करणार आहे. शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आज आणि उद्या दोन दिवस मराठवाडा दौरा करणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस(शप) नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील आज मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

किमान 50 हजार रुपये तातडीची मदत करा

ही अभूतपूर्व नुकसानीची परिस्थिती आहे, त्यामुळे अभूतपूर्व मदत शेतकऱ्याला करण्यासाठी निर्णय घ्या. प्रति एकर शेतकऱ्याला किमान 50 हजार रुपये तातडीची मदत व ज्या शेतमजुराचे श्रम नुकसान झालेले आहे, त्याला किमान 25 हजार रुपयाची तातडीची मदत करण्याचा निर्णय मंत्रालयात बसून घ्या. निर्णय न घेता अशाप्रकारे फिरणं ही केवळ नौटंकी ठरेल. की नौटंकी थांबवा आणि नुकसानग्रस्तांना खरीखुरी मदत करा, असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

ओला दुष्काळ नाही?

थोडक्यात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सद्यस्थितीला तितके सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. दुसरीकडे विरोधक मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने करताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारी मदत नेमकी किती मिळणार आणि त्याचा शेतकऱ्यांना नेमका किती फायदा होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित राहिला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News