आषाढी एकादशीचा राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत पंढरपुरातील वातावरण देखील भक्तीमय झाले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. मुंबईतील वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिर आणि डोंबिवली रेल्वे स्टेशनवरही उत्साह पाहायला मिळाला. राज्याच्या विविध भागातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू आला. पंढरपुरात दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.
20 लाख भाविक पंढरीत; विठूरायाच्या दर्शनाची आस
पंढरपुरात विठ्ठल नामाचा गजर पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईसह राज्यातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातून सुमारे 18 ते 20 लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. त्यासोबतच प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी 5 किलोमीटर इतक्या लांब रांगा लागल्या असल्याची माहिती आहे.

बळीराजाला सुखी ठेव; मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे
पंढरपुरात सद्यस्थितीला भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी देवीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदाच्या पूजेच्या मानकरीपदी नाशिक जिल्ह्यातील एका वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांचा ट्वीटर हँडलवर देण्यात आली आहे. आषाढी महापूजेसाठी जातेगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील कैलास दामू उगले (वय 52) आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले (वय 48) या दाम्पत्याची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे कैलास उगले यांचे वडील हे माजी सैनिक होते.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू ठेवण्यात आली, तर व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. ज्यामुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते. नामदेव पायरीलाही सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. पुढील काही दिवस भक्तांची मोठी गर्दी पंढरपुरात होणार आहे, त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा देखील सतर्क आहे.











