Cold wave alert: राज्यात थंडीचा कडाका वाढणार; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

महाराष्ट्रातील कमी झालेला थंडीचा कडाका आता पुन्हा एकदा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येण्याचा अंदाज आहे.

दक्षिणेकडील समुद्रात तयार झालेल्या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण होणार असून, मुंबईसह राज्यात थंड वाऱ्यांचा जोर वाढणार आहे. दिवसाचा उकाडा आणि रात्रीची वाढती थंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येण्याचा अंदाज आहे. तर कोकणात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार !

दरम्यान दुसरीकडे उत्तर भारतात मात्र थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे, मध्य भारतात देखील थंडी वाढण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात हवामान विभागाकडून कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र सरासरी तापमानाता घट होऊन पठारी प्रदेशात थंडीची लाट पहायला मिळू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे एकूणच या काळात विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची लाट पाहायला मिळेल. थंडीचा कडाका चांगलाच वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

दक्षिणेकडील समुद्रात तयार झालेल्या दोन हवामान प्रणालींमुळे संपूर्ण देशातील वातावरणात मोठी हालचाल सुरू आहे. सेन्यार चक्रीवादळाचे सामर्थ्य आता कमी झाले असले, तरी बंगालच्या उपसागरात अजून एक डीप डिप्रेशन सक्रिय झाले आहे. हे प्रणाली अधिक तीव्र स्वरूप धारण करून उत्तर तामिळनाडू, पुदुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांकडे सरकणार आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये 27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान, तसेच आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील थंडीवरही या हवामान बदलांचा परिणाम जाणवू लागला आहे. मध्य पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वरच्या स्तरावरील पश्चिमी विक्षोभ तसेच राजस्थानातील चक्रवात परिसंचरणाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसने घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तापमानात अचानक आलेली ही घसरण राज्यातील थंडीच्या कडाक्यात भर घालणार आहे.

हृदयविकाराचा धोका वाढला; काळजी घ्या !

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.

थंड हवेत अचानक बाहेर जाणे टाळावे आणि गरम कपड्यांचा योग्य वापर करावा. हलका व्यायाम नियमितपणे करावा, परंतु अत्यंत थंडीत जड व्यायाम टाळावा. आहारात गरम, हलके आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. भरपूर पाणी पिऊन शरीरातील ओलावा टिकवणेही महत्त्वाचे आहे. धूम्रपान, मद्यपान यांसारख्या सवयी थंडीत अधिक धोकादायक ठरतात, त्यामुळे त्यापासून दूर राहणे उत्तम. थंडीच्या दिवसांत छातीतील वेदना, श्वास घेण्यात अडचण, थकवा किंवा अस्वस्थता जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.


About Author

Rohit Shinde

Other Latest News