Kunbai Samaj : राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी समाजाच्या आरक्षणात समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय व हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी यामुळे कुणबी समाज आक्रमक झाला आहे. आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवघणे यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, मोठ्या संख्येने समाज बांधव हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कुणबी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहून सरकारला ताकद दाखवणार आहेत.
मूळ कुणबी समाजावर अन्याय
मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाला कुणबी दाखले दिले जात आहेत. या प्रक्रियेमुळे मूळ कुणबी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप कुणबी समाजनेत्यांनी केला आहे. याआधी ओबीसी समाजाने अनेकदा मोर्चे व आंदोलनांद्वारे सरकारला इशारा दिला होता. मात्र सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यावर ठाम राहिल्याने आता कुणबी समाज स्वतंत्र पातळीवर एल्गार मोर्चा काढून ताकद दाखवणार आहे.

पत्रकार परिषदेचे नियोजन केले जाणार
दरम्यान, येत्या २४ सप्टेंबर मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून यावेळी एल्गार मोर्चाची भूमिका विस्तृतपणे मांडली जाणार असल्याचे नवघणे यांनी सांगितले. तसेच घटस्थापनेपासून कोकणातील सात जिल्ह्यात कुणबी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तळागाळात कुणबी समाजाचे हक्क, अधिकारसंदर्भात जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्या प्रमुख मागण्या मांडल्या जाणार
- हैदराबाद गॅझेटीयर तात्काळ रद्द करावे
- मराठा समाजाला दिली जात असलेली कुणबी प्रमाणपत्रे थांबवावीत
- ओबीसींसह सर्वच घटकांची जातनिहाय जनगणना करावी
- प्रलंबित कुणबी शेतकरी समाजाचे प्रश्न सोडवावे











