Manikrao Kokate – खेळाडूसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता राज्यात राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) च्या प्रशिक्षणासाठी राज्यात लवकरच स्वतंत्र एनसीसी अकॅडमी उभारण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. या प्रशिक्षण संस्थेसाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करण्याच्या सूचना कोकाटे यांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
एनसीसी विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी
दरम्यान, राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) राज्यातील विद्यार्थी शाळा, कॅम्प, क्रीडा आणि विविध उपक्रमांत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेकडून मिळणारे ‘सी सर्टिफिकेट’ आज सैन्यदल, पोलीस दल आणि विशेष म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे अनेक क्षेत्रात एनसीसी विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. असं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत आज मंत्रालयात एनसीसीच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी, भारतीय नौदल छात्र सेनेचे संचालक कॅप्टन जेनीश जॉर्ज आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज
एकूणच राष्ट्रीय छात्र सेनेचे योगदान लक्षात घेता भविष्यात महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मंत्री कोकाटे यांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यावर तातडीने कामा लागा…आणि अहवाल सादर करण्याच्या सूचना कोकाटे यांनी दिल्या. या बैठकीदरम्यान एनसीसी विद्यार्थ्यांनी बनविलेली भारतीय नौदल युद्ध नौकेची प्रतिकृती अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी क्रीडा मंत्री कोकाटे यांना भेट दिली. यावेळी क्रीडा विभागातील संबंधित अधिकारी अधिकारी उपस्थित होते.











