पंजाब नॅशनल बँक घोटाळा हा भारतातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. या घोटाळ्यात प्रमुख आरोपी म्हणून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची नावे पुढे आली. त्यांनी बँकेच्या अधिकार्यांच्या मदतीने बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग काढून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली. या घोटाळ्यामुळे बँकेची प्रतिष्ठा धोक्यात आली आणि गुंतवणूकदारांचा विश्वास हादरला. आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणसाठी भारत सरकारकडून खरंतर विशेष प्रयत्न केले जात आहेत.
मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न
13,500 कोटी रुपयांच्या PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या हालचाली आता तीव्र झाल्या आहेत. भारत सरकारने बेल्जियम सरकारला पत्र लिहून मेहुल चोक्सीचे मानवी हक्कांचे रक्षण केले जाईल आणि त्याच्या आरोग्याचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे. भारताच्या गृह मंत्रालयाने बेल्जियमच्या न्याय मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे, त्यामुळे चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या चर्चेने जोर धरला आहे.

घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच मेहुल चोक्सीने 2017 मध्ये भारतातून पळ काढला आणि 2018 मध्ये अँटिग्वा व बर्मुडाचे नागरिकत्व स्वीकारले. मनी लाँड्रिंग व फसवणुकीच्या आरोपाखाली CBI आणि ED ने मेहुल चोक्सी व नीरव मोदीविरुद्ध खटले दाखल केले असून घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी मेहुल चोक्सीची मालमत्ता 2,500 कोटींहून अधिक किंमतीची जप्त करण्यात आली आहे.
पीएनबी बँक घोटाळा नेमका काय?
मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदीवर 13,850 कोटी रुपयांच्या PNB बँक घोटाळ्याचा आरोप असून दोघांनी मुंबईतील पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेतून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिटद्वारे बँकेला कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. दोघांनी PNB च्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट हमी म्हणजे LoU जारी केल्या. या हमींच्या आधारे कोणत्याही हमीशिवाय परदेशातील बँकांकडून कर्जे घेण्यात आली. बँक कर्जातून मिळालेले पैसे विविध शेल कंपन्यांना (बोगस कंपन्या) हस्तांतरित करण्यात आले आणि हे पैसे मनी लाँड्रिंग आणि बनावट व्यावसायिक व्यवहारांसाठी वापरले.
मेहूल चोक्सीबद्दल थोडक्यात माहिती
गीतांजली ग्रुपचे माजी अध्यक्ष मेहुल चोक्सीची एकेकाळी देशातील सर्वात मोठी दागिन्यांची किरकोळ विक्री साखळी होती आणि 4 हजारांहून अधिक दुकाने होती. 5 मे 1959 रोजी जन्मलेल्या चोक्सी यांनी 1985 मध्ये वडील चिनुभाई चोक्सी यांचा हिऱ्यांचा व्यवसाय हाती घेतला. त्यांनी देशभरात हिऱ्यांचा व्यवसाय वेगाने वाढवला आणि दागिने उद्योगात मोठं नाव कमावलं.











