नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं दिल्लीच्या विज्ञान भवनात सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवस संघाच्या शताब्दी वाटचालीची मांडणी करत आहेत. या कार्यक्र्मात बोलताना दुसऱ्या दिवशी त्यांनी महत्त्वाचं विधान केलं.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, जेवढा विरोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झाला, तितका विरोध इतर कोणत्याही संघटनेचा अद्याप झाला नाही. विरोध झाला असला तरी स्वयंसेवकांच्या मनात समाजाबाबत शुद्ध सात्विक प्रेमाचीच भावना कायम राहिली. या प्रेमामुळेच आता संघाच्या विरोधाची धार आता कमी होत चालली आहे.

स्वयंसेवकांनाही भागवतांनी दिला सल्ला
या वेळी बोलताना सरसंघचालकांनी स्वयंसेवकांनाही सल्ला दिला आहे. चांगल्या माणसांशी मैत्री करा, जे चांगलं काम करत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असं मोहन भागवत म्हणालेत. विरोधकांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करा, असंही त्यांनी स्वयंसेवकांना सांगितलंय. चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात क्रूरता दाखवू नका, उलट त्यांच्याबाबत कारुण्यभाव ठेवा. असा सल्ला त्यांनी स्वयंसेवकांना दिलाय.
संघात येऊन काय मिळतं ?
सरसंघचालक म्हणाले की संघात येऊन काय मिळंत, हा प्रश्न अनेकजणं विचारतात. त्यावर आमचं उत्तर असतं की संघात येून काहीच मिळत नाही. उलट तुमच्याकडे आहे ते जाईल. हे हिम्मत असलेल्या लोकांचं काम आहे. अशी स्थिती असूनही स्वयंसेवक काम करतायेत. कारण समाजाची निस्वार्थ सेवा करण्यातच त्यांना सार्थकता वाटतेय. यातूनच त्यांना आनंद मिळतोय.
खऱ्या धर्माबाबत काय म्हणाले भागवत?
आपल्या धर्माचं मोठेपण गात दुसऱ्या धर्माचं नुकसान करणं हा खरा धर्म नव्हे, असं परखड मत मोहन भागवतांनी मांडलंय. खरा धर्म तोच आहे जो सगळ्यांना सुख देईल. जिथे दु:ख आहे तो खरा धर्म नाही. धर्मासाठी त्याग करावा लागतो. धर्माचं रक्षण केल्यानं सगळ्यांचं रक्षण होतं. धर्माचं रक्षण झालं तर सृष्टी योग्य पद्धतीने चालते.
सगळ्यांच्या श्रद्धांचा सन्मान- भागवत
वेगवेगळ्या मान्यतांचा आणि विविध पंथांना मानणाऱ्यांच्या श्रद्धेचा सन्मान करतो, तोच हिंदू आहे. असं सरसंघचलाक मंगळवारी म्हणाले होते. आपला धर्म सगळ्यांशी सनमन्वयाचे धडे देतो संघर्ष करण्यास सांगत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. गेल्या ४० हजार वर्षांत अखंड भारतात राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचा डीएनए एकच आहे, असंही ते म्हणाले. अखंड भारताच्या भूमिवर राहणारे नागरिक आणि आपली संस्कृती यांच्यात सद्भाव राहायला हवा. भारताला आता जगात योगदान द्यायचं आहे आणि आता ती वेळ आली आहे, असंही सरसंघचालकांनी म्हटलंय.











