Bihar Assembly Election: बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला; कुणाला धोका, कोण सेफ?

बिहारमध्ये मागील निवडणुकीत 55.81 टक्के मतदान झालं होतं. यंदा 5 वाजेपर्यंत 60.13 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे मतदानाचा आकडा 60 टक्क्यांहून अधिकचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर मतदान पार पडलं. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान हे दाखवतं की जनतेला बदल हवा आहे. नवी व्यवस्था येत आहे.  त्यामुळे एकूणच बिहारमध्ये सध्या सत्ताधारी पक्षाला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला !

बिहारमध्ये गेल्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81 टक्के मतदान झालं होतं. यावेळी सायंकाळी 5 वाजता मतदानाची आकडेवारी 60.13 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, नव्या माहितीनुसार बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.46 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी महिलांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. प्रशांत किशोर यांचा पक्ष यावेळी पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांच्या पक्षाला किती जागांवर विजय मिळतो ते पाहावं लागेल. यंदा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला देखील बिहारमध्ये चांगले यश मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बिहारमध्ये नेमकी कुणाची सत्ता येईल?

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी सत्ता कोणाच्या हातात येईल हे आजच्या घडीला ठरवता येणे कठीण आहे. सध्याचे अंदाज आणि मतदारांच्या प्रवृत्तीवरून वेगवेगळ्या पक्षांची शक्यता दिसून येते, जसे की राजद, जेडीयू, भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील सत्ता स्पर्धा. निवडणुकीच्या निकालावर अनेक घटक प्रभाव टाकतात. स्थानिक मुद्दे, उमेदवारांची लोकप्रियता, जातीय-समूहीय समीकरण, आणि राष्ट्रीय व राज्यस्तरीय धोरणे. अंतिम निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होईल आणि त्यानंतरच स्पष्ट होईल की बिहारमध्ये कोणत्या पक्षाची किंवा गटाची सत्ता स्थापली जाईल. मात्र एकूणच महागठबंधन (आरजेडी, काँग्रेस +) आणि एनडीएमध्ये या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.

राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News