शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते आणि ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मागील काही दिवसापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. कालच संजय राऊत यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय राऊत यांना लवकरात लवकर बर वाटावे आणि ते आजारातून मुक्त व्हावे यासाठी शिवसैनिक प्रार्थना करत आहे. याच दरम्यान आज स्वतः संजय राऊत यांनी रुग्णालयातील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. संजय राऊत यांचा हा फोटो पाहून तुमचे मन नक्कीच हळहळेल..
काय आहे राऊतांची पोस्ट – Sanjay Raut
याबाबत संजय राऊतांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत संजय राऊत हे रुग्णालयातील बेडवर रुग्णाचे कपडे घालून बसल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्या हातावर सलाईन लावल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ते एक पेपर आणि पेन हातात धरुन लिहित असल्याचे दिसत आहेत. या पेपरवर एडिट असे लिहिलेल असल्याने ते सामनाचा अग्रलेख लिहित असावे असे बोललं जात आहे. या फोटो सोबत संजय राऊतांनी (Sanjay Raut) खास कॅप्शन लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता! असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हात लिहिता राहिला पाहिजे
कसेल त्याची जमीन
लिहील त्याचे वृत्तपत्र
हा आमच्या पिढीचा मंत्र होता! pic.twitter.com/AowQ9MhfLN— Sanjay Raut (@rautsanjay61) November 6, 2025
राऊत मातोश्रींचे निष्ठावान
दरम्यान संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ आणि मातोश्रीचे निष्ठावान म्हणून समजले जातात. एकनाथ शिंदे सोबत ४० आमदार गेले, निवडणूक आयोगाने ठाकरेंचे पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. त्यावेळी संजय राऊतच शिंदे गटावर हल्लाबोल करत होते. देवेंद्र फडणवीस असो व पंतप्रधान नरेंद्र मोदी … संजय राऊतांची तोफ रोज सकाळी धडाडताना उभा महाराष्ट्र पाहत असतो. संजय राऊत हे मधल्या काळात तुरुंगातही जाऊन आले मात्र त्यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही. आजही ते शिवसेनेचा आवाज म्हणून ओळखले जातात. संजय राऊत जे काही बोलतात ती शिवसेनेची अधिकृत भूमिका असते असं मानलं जातं. मात्र आज हेच संजय राऊत एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याने शिवसैनिक चिंतेत आहे. राऊत लवकरात लवकर बरं होवो अशा प्रार्थना शिवसैनिकांकडून केल्या जात आहेत.











