पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून उत्तोमत्तम खेळाडू घडतील, मंत्री आशिष शेलारांचा विश्वास

पनवेल कार्यक्षेत्रात क्रिकेट खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता दिसून येते. या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल आणि इथले खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघातून खेळताना दिसतील.

मुंबई भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. येथे क्रिकेटशिवाय दुसरा कुठलाही खेळ जास्त प्रमाणात खेळल्याचे दिस नाही. दरम्यान, पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक, उत्तोमत्तम खेळाडू निश्चितच घडतील. तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतील, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

इथले खेळाडू भारतीय क्रिकेट संघात दिसतील

दरम्यान, दिलीप वेंगसरकर यांच्या सारख्या जाणकार क्रिकेटपटूंकडून प्रशिक्षण घेऊन, या अकादमीतून उत्तम खेळाडू घडतील. असा मला विश्वास आहे, असं खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले. तर पनवेल कार्यक्षेत्रात क्रिकेट खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता दिसून येते. या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल आणि इथले खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघातून खेळताना दिसतील. असे यावेळी पद्मश्री दिलीप वेंगसरकर म्हणाले. दरम्यान, या उद्घाटन प्रसंगी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर, आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कसे आहे मैदान?

१५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत आणि इतर आवश्यक सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र साडेसात एकर क्षेत्रावर साकारले असून यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. दरवर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५० टक्के, उर्वरित रायगड जिल्ह्यासाठी २५ टक्के आणि जिल्ह्याबाहेरील २५ टक्के असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News