राज्यात तापमानाचा पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा अलर्ट

राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घरसला आहे. बुधवारी, पुणे, जळगाव, नाशिक, मालेगाव, बीड, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठ्या जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून अनेक ठिकाणी पूर्णपणे कोरडे हवामान असेल. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे.

राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव वाढला; थंडीचा कहर

राज्याच्या अनेक भागात पारा घसरायला सुरूवात झाली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा पारा हा 6 अंशांहून कमी झाल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये कोल्ड वेवची स्थिती कायम राहणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

पुणे शहराचे तापमान 8.1 अंशावर घसरले आहे. यंदाचा हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पुण्यात थंडीची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. शहराच्या बाकी भागात तापमान 10-12 अंशावर स्थिर आहे. मात्र पुण्यातील तापमान शिवाजी नगर 8.9 अंश सेल्सिअसवर आले आहे. पाषाण मधील तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतके आहे.

नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा मुक्काम कायम आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र मध्ये थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. निफाडचे तापमान 6.1 अंश सेल्सिअस तर नाशिकचा पारा 8.2 अंशावर गेला आहे. पुढील दोन तीन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात थंडीचा प्रभाव; नागपुरात तापमानात घट

नागपुरात आज या मोसमातील दुसऱ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात आज 8.1 डिग्री सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. काल नागपुरात 8 डिग्री सेल्सिअस किमान तापमान होता, जो या मोसमातील सर्वात निचांकी तापमान होते, त्यामुळे आजचा किमान तापमान या मोसमातील दुसरा निचांकी तापमान आहे. विधिमंडळ परिसरात आपापल्या कामासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांना सकाळच्या सत्रात तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News